Wednesday 21 March 2012

विवाहपूर्व समुपदेशनाची गरज



 www.daptaryswiwah.com विवाहपूर्व समुपदेशनाची गरज
पालक जेव्हा मुला-मुलींचे नाव नोंदवायला आमच्या कडे येतात किंवा फोन वर चौकशी करतात तेव्हा ते खूप वेळा सांगतात की विवाहपूर्व समुपदेशनाची फारशी गरज नाही.काहीना तर ते एकप्रकारे fad वाटते किंवा काही लोकांनी मुद्दाम निर्माण केलेली गरज वाटते.पण खरोखरच तसे नाही.आम्ही पालकांना सांगतो की तुमच्या मुलाने किंवा मुलीने एकदा तरी ,विवाहपूर्वी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे,काही गोष्टींचा वेगळ्या पद्धतीने विचार करायला हवा. तेव्हा काहीजण म्हणतात,आमच्या मुलांना सगळं कळतं,आणि त्यात समजून घ्यायचं तरी काय ते आपोआपच कळतं.पण पालकांच्या काळात होती तशी परिस्थिती नाही,ती वेगाने बदलली आणि पालकांच्या काळात जर विवाहपूर्व समुपदेशन असते तर नक्कीच त्यांनी आपल्या जोडीदाराकडे अधिक सजगपणे पहिले असते किंवा तसा प्रयत्न तरी केला असे वाटते.म्हणून आम्ही काही मुद्दांची  नोंद केली आहे ज्यामुळे कळेल की विवाह पूर्व समुपदेशनाची गरज का आहे .
·        लग्न यशस्वी होण्यासाठी मुला-मुलींना त्यांची कौशल्ये विकसित करणे.
·        लग्न इच्छूक मुला-मुलीं मधील विरोधाभास लग्नापूर्वीच ओळखण्यास मदत करणे,आणि ते विरोधाभासां बरोबर जुळवून कसं घेता येईल किंवा ते कोणत्या कारणाने दिसत आहेत ते ओळखून ते संपविणे.कारण या छोट्या विरोधां मुळे पुढील आयुष्यात मतभेद निर्माण होवू शकतात.
·        मुला-मुलींना त्यांची आवड स्पष्टपणे कळत नाही.
·        मानसिकता बदलणे.
·        पालक आणि मुलं यांच्यात संवादाचा पूल बांधणे.
·        कुटुंबामध्ये संवादाची उणीव.पालकांसमोर  एक पर्याय असतो तर मुलांसमोर दुसरा पर्याय असतो.यामुळे गोंधळ निर्माण होतो आणि ते योग्य व्यक्तीची निवड करू शकत नाही.
·        काही लग्न इच्छूक मुलं-मुली त्यांच्या अपरिपक्व मित्र-मैत्रिणीं कडून सल्ले घेतात त्यामुळे अतिशय कठीण आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण होते.
·        लग्न म्हणजे नक्की काय समजून घेणे.
·        आज लग्न चाकोरीबद्ध पद्धतीने ठरावे असं पालकांना वाटत  असले तरी ते लवकरात लवकर ठरत नाही.
·        एकमेकांची अपुरी माहिती,कुटुंब व त्यातील वातावरणाची अनुरुपता ,परस्परांशी जुळवून घेण्याच्या,तडजोड करण्याच्या वृत्तीचा अभाव.
·        पती-पत्नीच्या नात्याकडे दोन व्यक्ती,माणसा तील नात्याऐवजी पुरुष-स्त्री असं बघण्याची पारंपारिक दृष्टी,
·        स्वतःच्या अपेक्षांच्या फूटपट्ट्या दुसऱ्याला लावतांना इतरांच्या अपेक्षांचा मात्र अस्वीकार.
·        पूर्वकल्पना न दिलेल्या अपेक्षांच्या पुर्तेतेचा आग्रह.
·        पुरेसा परिचय होण्यासाठी असलेला अपुरा वेळ
·        सांकेतिक,साचेबंद गोष्टींना अति महत्व त्यामुळे अंतरंगाकडे दुर्लक्ष होत आहे.
·        मुला-मुलींना वाढवण्यात झालेले फरक
·        एकतर्फी तडजोडीला नकार
·        मुलींना झालेली आत्मसन्मानाची जाणीव,
·         शिक्षण,नोकरी,परदेशातील नोकरी यात मुलींनी-मुलांच्या बरोबरीने केलेली घोडदौड
·        आर्थिक स्वावलंबनामुळे आलेलं बळ,
·        जागतिकीकरणामुळे जीवनाला आलेली गती,ताणतणाव,असुरक्षितता,एकाकीपणा,अस्वस्थता
 

या सगळ्या बदलेल्या गोष्टींना सामोरं जावून,त्यांच्याशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने,स्व-बदल घडवून आणणे आवश्यक झालं आहे. व्यक्ती बाहेरचा ताणतणाव घरात आणते आणि तिला तिथे एक समजूतदार व्यक्ती हवी असते. ती व्यक्ती म्हणजे बहुतांशी वेळा जोडीदार असते. त्याच्या कडूनच अपेक्षा केल्या जातात.पण त्यासाठी तुमचं सहजीवन सुंदर आणि स्वास्थ आणि समाधान देणारं असायला पाहिजे. त्यासाठी विवाहपूर्व समुपदेशनाची गरज आहे.




Sunday 18 March 2012

भ्रम दोघांचा


   www.daptaryswiwah.com आपण स्वतःला न ओळखता लग्न करतो आणि नंतर जोडीदरात    आपल्याला हवे असणारे गुण शोधत राहतो.आपण जोडीदाराला यंत्र समजत असतो का की ते आपल्या इच्छे प्रमाणे धावेल.व्यक्ती म्हणून आपण जोडीदाराचा विचार केला तर साध्या गोष्टीच्या  मोठ्या समस्या होणार नाही. दोन व्यक्तींचे सहजीवन छान  फुलेल.आमच्या कडे कार्यशाळेत विचारलेल्या प्रश्नाचे आणि त्यांच्या उत्तराचे संकलन केले होते.त्यातून आमच्या लक्षात आले की काही भ्रम स्त्री-पुरुषांचे असतात.ते मुद्दाम तुम्हांला वाचायला देत आहोत.कार्यशाळेत सहभागी झालेल्यानी काही गोष्टींची नोंद केली होती.बघा तुम्हांला ती यादी कशी वाटते.

भ्रम पुरुषाचा
        
बायको आवडत नाही याची काही कारणं.
*
दिसायला सुंदर ,चांगली  नाही,उंच नाही,देखणी नाही ,स्मार्ट नाही .
*
वेंधळी ,गबाळी ,अडाणी आहे.हुषार नाही.
*
बोलता येत नाही.बोललेलं समजत नाही.
 
चारचौघात मिसळता येत नाही.नातेवाईक ,मित्रमंडळी  किंवा समाजात धीटपणे ,चतुरपणे वावरता येत नाही.
*
धोरणी ,चाणाक्ष ,तरबेज नाही,modern नाही.व्यवहार ज्ञान ,सामान्य ज्ञान नाही.बुरसट आहे.
*
चेष्टामस्करी समजत नाही,करता  येत नाही.वेळ मारून नेता येत नाही. खोटं बोलता येत नाही. कुणाला बनवू शकत नाही.
*
अती सरळ ,भोळसट आहे. तिला कुणीही फसवेल.
*
सेक्सी नाही,बोअरींग आहे. कामच करत राहते.
*
माहेर श्रीमंत नाही.

भ्रम स्त्रीचा 
  *नेभळट ,बावळट ,घाबरट आहे.
*
आईच्या ताटाखालचे मांजर
*
कर्तृत्वाच्या नावानं  बोंब आहे. या जन्मात कार घेईल असं वाटत नाही.
*
नोकरीच्या ठिकाणी हा मागेच असणार.'
*
कशातलच काहीच कळत नाही.
*
बोलतांना थुंकी काय उडवतो,कुठेही चारचौघात अंगच काय खाजवतो,नाकात बोटच काय घालतो आणि वर कटकट्या आहे.

Wednesday 14 March 2012

प्रतिसाद




 प्रतिसाद
 www.daptaryswiwah.com प्रतिसादावर सगळं काही अवलंबून असतं.असं आमची एक मैत्रीण म्हणाली.तिला विचारलं तू आणि तुझे आई-वडील तुझ्या लग्नाचं बघत होते ते मिशन कुठ पर्यंत आले? त्यावर तिचं असं न कळणार उत्तर होतं. आम्ही आमचे चेहरे काही समजलं नाही असे केले.ते बहुतेक तिला कळलं असावं.म्हणून ती सविस्तर उत्तर द्यायला तयार झाली.
     ती म्हणाली मी अनेक स्थळं पहिली,पण एकानेही मला प्रतिसाद दिला नाही.आमच्या एका मित्राची पण  हीच समस्या होती. अग पण तू साद तरी घातलीस का?’
   छे! मला कुठे एवढा वेळ.?
म्हणजे तू फक्त चित्रं पहिली ?आमच्यातल्या एकीने विचारले.तिला फोटो म्हणायचे होते.
हो.
मग त्या फोटोंना कसं कळेल की तुझ्याशी संपर्क साधायचा आहे ते?असाच प्रश्न आम्ही आमच्या मित्राला केला तरी त्याचं एकच पालूपद- आम्हांला कोणी प्रतिसाद देत नाही.
 असं का होत असेल ? याचा विचार केला तेव्हा काही कारणं लक्षात आली.पहिलं कारण तर तुम्हांला कळलच असेल की हे लोक फक्त माहिती आणि फोटो स्वतः बघतात आणि समोरच्या व्यक्तीला काही न कळवता प्रतिसादाची अपेक्षा करतात.हे कसं शक्य आहे?दुसरं कारण म्हणजे त्यांच्या जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा असतात.बरं अपेक्षा करतांना त्यांच्या स्वतःची माहिती त्या अपेक्षा पूर्ण करण्या इतकी सक्षम आहे का? हे तपासून पाहत नाही.तिसरं कारण म्हणजे जेव्हा केव्हा त्यांच्याशी कोणी संपर्क साधण्याचा प्रयत्न करी तेव्हा ते अलिप्तपणे सांगतात की ,ते कामात खूप busy आहे, आत्ता त्यांना वेळ नाही.नंतर फोन करण्याचे आश्वासन देवून ते फोन करत नाही.असं करण्यात त्यांना कमीपणा वाटतो.मग हळूहळू त्यांना संपर्क करणारे टाळू लागतात.मग प्रतिसाद येत नाही अशी त्यांची ओरड सुरु होते.
    लग्नाचे बघतांना राहणीमान,नोकरी, आणि भौतिक वस्तूंची रेलचेल या गोष्टी आधुनिक नजरेने बघत असलो तरी काही बाबतीत आपण खुपच पारंपारिक असतो.आणि बऱ्याच वेळा प्रतिसाद देतांना आपण पारंपारिक होतो.सगळ्यांचं कुटुंब आधुनिक विचारांचं पण सगळेजण निश्चितपणे पत्रिका बघणार.काहीजण तर ठराविक व्यक्ती कडूनच बघणार.मग मुलगी,मुलगा आवडला नाही,किंवा त्याचे शिक्षण,पगार,व्यक्तिमत्व आवडले नाही तर पत्रिका जुळत नाही असं सांगणार.यात विचार जुळले आहेत  असं फार कमी वेळा होतं.ज्यांना पत्रिका बघायची आहे त्यांनी तिची मर्यादा ठरवायला हवी.
     आणखीन एक फार महत्वाचं कारण लक्षात आलं ते हे की,बऱ्याच वेळा मुलं-मुली पालकांच्या समाधानासाठी स्थळं बघतात,पण त्यांना योग्य प्रतिसाद देत नाही.म्हणजे पालक आणि मुलं यांच्यात मोकळा संवाद नसतो.दोघांच्या बाजू योग्य असल्या तरी काही गोष्टी परिस्थिती नुसार ठरवाव्या लागतात.काहीवेळेस मुला-मुलींनी लग्न ठरवलेले असतात तरी त्यांचे पालक मान्य करत नाही.मग पालकांना अंधारात ठेवण्यासाठी नाव नोंदणीचा खेळ खेळला जातो.पण त्यामुळे जी व्यक्ती संपर्क साधते तिला प्रतिसाद मिळत नाही.

Monday 12 March 2012

सहजीवन







 www.daptaryswiwah.com काल एका कार्यक्रमाला गेले होते. तिथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सहजीवनावरील  काही प्रसंगाचे नाट्यीकरण केले होते. त्यांचे सहजीवन समता,मैत्र, आणि स्वातंत्रावर आधारलेलं होतं. सध्या आपण विवाह या विषयाचा अधिक विचार करत आहोत,म्हणून मला त्यांचे सहजीवन खूप महत्वाचे वाटले. कारण बहुतेक जणांना लग्न करायचे असते,पण त्यात सहजीवन फुलेलच याची खात्री वाटत नाही. किंवा तो विचारही काहींच्या मनात नसतो.
  विवाह ही समाजमनाच्या गाभ्याशी असणारी गोष्ट आहे. हजारो वर्ष चालत आलेली ती प्रथा असल्याने आपल्याला ती नैसर्गिक वाटते.पण ती मानवनिर्मित प्रथा आहे. त्यामुळेच तिच्यात कालानुरूप बदल व्हायला पाहिजे असं आम्हांला वाटते. कारण त्यामुळे विवाह जास्त अर्थपूर्ण होईल आणि काळानुसार येणाऱ्या अडचणीवर दोघं मिळून मात करू शकतील.अशा प्रकारचे नातेसंबध मानवी जीवनात खूप महत्वाची भूमिका बजावू शकतात.
     तरीही आंज अनेकजणांना वाटते की वैवाहिक सहजीवनात काही आनंद आहे का? असलाच तर तो शोधण्याची वाट कोणती? खरं तर या प्रश्नाचे उत्तर सोप्या शब्दात देता येईल पण तशी अमलबजावणी करणं हे प्रत्येकाच्या कुवतीवर अवलंबून आहे. कारण स्वतः एक चांगलं माणूस बनण्याचा प्रयत्न करत, अशाच दुसऱ्या चांगल्या माणसाची साथ शोद्था आली तर त्याचं सहजीवन आनंदी होण्याची शक्यता आहे. पर्ण प्रत्यक्षात आपल्या माणूसपणाच भान येणं,ठेवणं सोपं नाही. म्हणूनच आपल्या विचारांची,भावनांची,आपल्या जगण्याच्या मूल्यांची व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर सतत तपासणी करणं आवश्यक आहे. स्वतः समृद्ध होण्याची आस बाळगणारी व्यक्ती,स्वतःच्या विकासाचा विचार करत असतानाच इतरांच्या विकासाची आपल्या बरोबरीने वाटचाल होते आहे ना याचं भान ठेवते.
     म्हणूनच पतीपत्नीच्या नात्यात आनंद नांदण्यासाठी दोघांनीही स्वतःबरोबर जोडीदाराच्या भावना,विचार,विकास याची काळजी वाहण यासाठीच गरजेचे आहे. हे मला ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या सहजीवनातून जास्त लक्षात आले.

Friday 9 March 2012

थोडासा अभ्यास







 www.daptaryswiwah.com आजूबाजूला अनेक अस्वस्थ पती-पत्नी दिसतात. तेव्हा खूप वाईट वाटतं.कारण अशी कुटुंबची कुटुंब अस्वस्थ झाली तर सामाजिक स्थिती बिघडेल आणि त्या सर्व गोष्टीचा परिणाम आपल्या सगळ्यांवर होणार.तुम्ही म्हणाल आमचा काय संबध या सर्व गोष्टींचा? तुम्हांला असं वाटलं तरी त्याचा तुमच्याशी संबंध येणारच.म्हणून तुम्ही जेव्हा जोडीदार निवडाल तेव्हा जर मनापासून आणि खरा विचार कराल तेव्हा मात्र ही परिस्थिती काही प्रमाणात बदलू शकते.
  कारण जोडीदार निवडतांना तुम्ही त्याच्या बाह्य गोष्टी पेक्षा त्याच्या कडे व्यक्ती म्हणून पाहिले  पाहिजे. त्याच्या गुणांचा विचार केला तर सहजीवना फुलेल.आज जी अनेक दाम्पत्यांमध्ये अस्वस्थता दिसते ती दिसणार नाही. कारण तुम्ही तुमचे अंतर्गत गुण बघून जोडीदार निवडाल.असा जोडीदार जो आपल्या स्वभावाला योग्य असेल,आपल्या व्यवसायाला,नोकरीला अनुरूप असा जोडीदार नसेल तो.
   आज आपण लग्न करण्यापूर्वी घर रंगवून घेतो,घराची दुरुस्ती करून घेतो,पाहुण्यांना दाखवण्यासाठी काही वस्तू मुद्दाम खरेदी करतो.मुलांना नोकरी करणारी मुलगी हवी म्हणून तिला तसं तयार केले जाते,मुलीला अधिक पगाराचा मुलगा हवा म्हणून मुलाला त्या प्रकारे शिक्षण देण्याचा प्रयत्न होतो,चार चाकी घेतली जाते.सगळ्यांना सुंदर आणि श्रीमत स्थळ मिळावं असं वाटतं आणि त्या आशेवर मोठ मोठी वाक्ये बोलून खोटी आशा बाळगत नाटक सुरु असतं.
   हे सगळं बदलायचं असेल तर बाह्यरुपा पेक्षा आंतला माणूस त्याचे गुण बघायला हवे.पण त्या आधी स्वतःचा स्वभाव ओळखता यायला हवा.अर्थात ही गोष्ट फार अवघड आहे.कारण “स्वभाव” या शब्दात खूप अर्थ आहे आणि तो खूप व्यापक आहे.आपल्या घरात बहुतेक वेळा बोलले जाते की तू आई सारखा किंवा वडिलांसारखा.पण या पलीकडे स्वभावाचा विचार आपण करत नाही. तो लग्न करण्यापूर्वी करावा,ही एक संधी समजावी असं आम्हांला वाटते.मी जरा शब्दात मांडण्यासाठी मदत करू शकते.स्वभावासाठी काही शब्द देते,बघा.
   संतापी,शांत,मनमिळावू,अलिप्त,आत्मकेंद्री,अबोल,बोलका,मित्रप्रिय,घुमा,आळशी,कामसू,कल्पक,सर्जनशील,जिद्दी,उथळ,खटपटी,तार्किक,सरळ,
अजून बरेच सांगता येईल पण तुम्ही ते शोधा यापैकी तुम्ही कसे आहात ते?मग तुम्हांला कसा जोडीदार हवा ते लिहा.अहो लग्न करून आयुष्याचा जोडीदार मिळवणार आहोत मग अभ्यास असायलाच हवा ना.  

Wednesday 7 March 2012

तडजोड


  www.daptaryswiwah.com मला मुळी लग्नच करायचे नव्हते,पण माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींचे लग्न झाले आणि ते त्यांच्या संसारात रमले,मी फोन केला तर ते बोलतात,गप्पा मारायला भेटायचे असं ठरवलं की येतातही पण त्यांना सारखी घरची ओढ असते.सतत ते त्यांच्या बायका,नवरे,मुलं आणि मुली यांविषयी बोलत असतात.मग मला त्यांच्या बरोबर फार कंटाळा येतो.पूर्वी सारखी मजा येत नाही.आता त्यांना त्यांचा हक्काचा जोडीदार मिळाला आहे,आणि मी मात्र घर आणि ऑफिस यामध्ये अडकले आहे. शिवाय आई-वडिलांशी सारखा लग्नावरून वाद होतो.अगदी नको वाटते.खरं सांगायचं तर मलाही लग्न करावसं वाटतयं पण भीती वाटते की खूप तडजोडी कराव्या लागतील का? निकिता आमच्या जवळ  तिच्या मनातले विचार सुसंगत रित्या मांडण्याचा प्रयत्न करत होती. आम्हांला तिच्या प्रामाणिकपणाचे खूप कौतुक वाटले.
  खरं तर आयुष्य म्हणजे निवड आणि तडजोड होय. त्यात आपल्याला विरोधाभास वाटतो.पण जर आयुष्यात जर निवडीला भरपूर वाव असेल तर तडजोड करण्याचा प्रश्न येतोच कुठे?मुख्य म्हणजे तडजोड ही सुद्धा आपली निवडच असते.
  म्हणूनच लग्न करण्यापूर्वी सरळ एक यादी करणं गरजेची आहे.की मी कुठे किती प्रमाणात तडजोड करू शकते आणि कुठे अजिबात नाही.अर्थात ही यादी करतांना ति वास्तववादी आणि स्वतः एक माणूस आहे आणि जोडीदार म्हणून एका माणसाचीच निवड करणार आहे हे लक्षात घेणे अति गरजेचे आहे.कारण दुसऱ्या व्यक्ती कडून अपेक्षा करतांना आपण काहीही करू शकतो कारण ते दुसऱ्या कडे ते हवं असं आपल्यला वाटते. स्वतः कडे काय आहे हे बघत नाही.म्हणूनच निकिताला भीती वाटत होती ती तडजोडीची. 
   आयुष्य म्हणजे केवळ मौजमजा,जल्लोष नव्हे.कारण आयुष्यात आपल्याला अतीव दुःख,वेदना,नैराश्य यांना सामोरे जावं लागतं.कधीतरी अकल्पित,अनपेक्षित गोष्टी घडतात,दुर्घटना घडतात,सगळं काही विस्कटून जावू शकतं.अशावेळी आपण काय करायचं? कसं वागायचं? हे आपल्या जवळ कोणत्या विचारांचं पाठबळ आहे यावर ठरतं.इंद्रधनुष्य निर्माण होण्यासाठी उन आणि पाऊस दोन्हींची गरज असते. आपल्या जीवनाबाबतही तसेच असते कधी तिथे अंधःकार तर कशी उजेड असतो.पण आपला जोडीदार हा आपल्यला समजून घेणारा असेल तर आपण सगळ्यातून पुढे जावू शकतो.पण म्हणूनच योग्य जोडीदार निवडतांना कोणत्या गोष्टीत आपण तडजोड करू शकतो हे लक्षात घ्यायला हवे.नाहीतर एवढेच लक्षात घेतले जाते की तो बी.ई,ती बी ई ,तो पुण्यात ती पुण्यात.वरवरच्या या जोड्या आयुष्यातल्या अडचणींवर मात करू शकतील का हे मात्र बघितलं जात नाही.निकिता समजली आहे.म्हणूनच तिने एक असा व्यावसायिक निवडला की जो नोकरी सोडून व्यवसायात आला आहे. ती म्हणते त्याच्याजवळ धाडस तर आहेच पण सकारात्मक विचारही आहे आणि ते ही बाजारपेठेचा विचार करून. मला आवडला.मी तडजोड केली ती त्याच्या नोकरी नसण्याबाबत.आणि तुम्ही?

Monday 5 March 2012

दिरंगाई





www.daptaryswiwah.com “एक महिन्यापूर्वी त्यांच्याच सांगण्यावरून आम्ही त्यांना सगळी माहिती पाठविली होती पण अजून त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही.”असं मुलामुलीचे पालक आम्हांला सांगत असतात.आम्ही जेव्हा अशा प्रकारची उत्तरे करणाऱ्या पालकांना विचारतो की, काय अडचण आहे,तुम्ही महिना झाला काहिच निर्णय कळवला नाही तर समोरचे लोक ताटकळत बसतील. तर ते आम्हांला म्हणतात,आमचा मुलगा/मुलगी विचार करते आहे.विश्लेषण करते आहे.आम्ही सगळ्यांना विश्लेषण करायला सांगतो तेव्हा आमचा हेतू स्पष्ट असतो, त्यांना निर्णय घ्यायला सोपं जावं आणि त्यांना योग्य जोडीदार मिळवण्यासाठी मदत व्हावी.
     मी विचार करतो आहे,विश्लेषण करतो आहे असे शब्द वापरून काहीजण निर्णय घ्यायचं टाळतात. या शब्दाखाली स्वतःची दिरंगाई लपवण्याचा प्रयत्न करत असतात. २-३ महिने निघून जातात तरी त्यांचा विचार चालूच असतो, विश्लेषणही चालूच असते.
  आपण सगळ्यांनी लहानपणी ही गोष्ट नक्कीच ऐकली असेल.एक लहान मुलगा असतो तो म्हणतो,मी मोठा झाल्यावर हे करीन,ते करीन आणि सुख प्राप्त करीन.तो मोठा होतो,महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर तो परत म्हणतो मी सुखासाठी हे करीन,ते करीन.मग त्याला वाटते की नोकरी मिळाली की मला सुख प्राप्त होईल,मग त्याला नोकरी मिळते,मग लग्न करावे असं त्याला वाटते. पण जोडीदार निवडण्याच्या काळात तो फक्त स्वप्नरंजनच करतो,फक्त अपेक्षा ठेवतो,आपण कोणाच्या काय अपेक्षा पूर्ण करू शकतो याचा विचार करतच नाही.वास्तवादी विचार करून,काही तडजोडी आपल्याला कराव्या लागतील याचा विचार न करता जोडीदाराचा शोध घेतो.मग वय वाढते आणि एक दिवस त्याच्या लक्षात येते की हा हा म्हणता सारे आयुष्य त्याचे जोडीदारावाचूनच निसटत आहे.आणि आता त्याला साथ देणारे पालक,मित्र-मैत्रिणी कोणी नाही.त्याची त्यावेळची दिरंगाई फक्त त्याच्या सोबत आहे.
    दिरंगाई करणाऱ्यांचा आणखी एक प्रकार असतो. ते नेहमी म्हणतात,मी माझ्या मनाची तयारी करतो आहे” सहा महिने त्यांची तयारी चालूच असते.सबबी सांगण्याची त्यांची सवय त्यांच्या लवकर लक्षात येत नाही.
   आपण जर खरचं मनापासून लग्नाला तयार असू तरच पालकांना तसं सांगा.नाहीतर तुमच्या कडे स्थळं म्हणून लोक येतील आणि तुम्ही त्यांना वरील प्रकारची उत्तरे द्याल.आणि ती ही समोरच्या व्यक्तीवर उपकार केल्यासारखी.तुम्ही नाव नोंदवलं म्हणूनच लोक तुमच्याशी संपर्क करतात.मग त्यांना योग्य पद्धतीने उत्तर देणे ही आपली जबाबदारी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण योग्य जोडीदार निवडण्यासाठी काय केलं पाहिजे हे समजून घेवून त्याचा पुरेपूर उपयोग करून वर्तमान सार्थ करणं गरजेचे आहे.वर्तमानाचा पुरेपूर उपयोग करणं म्हणजे अप्रत्यक्षरीत्या अधिक चांगल्या भविष्याची तरतूद करणं होय.
लग्नाचा विचार सकारात्मकतेने करा. त्यासाठी चालढकल करण्याची सवय सोडून द्या.”विचार करूनच पण त्वरित कृती” हा मंत्र लक्षात ठेवा.
नाहीतर खालील उद्गार तुम्हांला काढावे लागतील.
तसं घडू शकलं असतं
मी तसं करायला हवं होतं.
मी ते विचारू शकलो असतो.
मी असा संवाद साधला असता तर बरं झालं असतं
मी थोडा अधिक वास्तववादी विचार केला असता आणि स्वतःला ओळखलं असतं तर किती छान झालं असतं.
असं होवू नये असं वाटत असेल तर जे काम तुम्ही आज करू शकता ते उद्यावर टाकण्याची चूक करू नका.

Saturday 3 March 2012

सहमती


www.daptaryswiwah.com “मी  माझ्या मुलाला सगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं आहे.वेळोवेळी व्यक्तिमत्व विकासाच्या शिबिराला पाठवलं आहे, त्यात त्याने वक्तृत्वकला सुद्धा शिकली.कसं राहावं हे सुद्धा त्याला नीट माहित आहे”आम्ही जेव्हा विवाहपूर्व मार्गदर्शनाच्या कार्यशाळेची माहिती दिली तेव्हा नीलिमाताई संजयच्या आई आम्हांला सांगत होत्या. की त्याला कोणत्याही मार्गदर्शनाची गरज नाही कारण त्यांनी सगळ्या गोष्टी त्याला लहानपणीच शिकविल्या आहेत.खरचं आहे त्यांचं.अशा प्रकारच्या शिबिरांमधून हसतमुखाने कसं बोलावं पासून कोणत्या वेळी कोणता पोशाख घालावा,टेबल manners ही शिकविल्या जातात.तरीपण लग्न करण्यापूर्वी काही गोष्टी आपल्याला माहित पाहिजे.कारण लहानपणच्या त्या शिबिरात आताच्या वयाला काय हवं ते कसं सांगणार?
     लग्न करण्यापूर्वी आपल्याला आपल्यातल्या काही गोष्टी माहित असल्या पाहिज्र. मुख्य म्हणजे स्वतःचा स्वभाव.आणि समोरच्या व्यक्ती तील चांगले गुण ओळखता आले पाहिजे.तरच आपण ज्या सौंदर्याचा विचार करत होतो तो परिपूर्ण होईल.
   आपण जर एखाद्या व्यक्तीला किंवा होणाऱ्या जोडीदाराला भेटायला जाणार असू तर ती व्यक्ती मनाने सुंदर आहे की नाही हे बघायला हवे. सुंदर मनासाठी तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत त्या व्यक्तीशी तुम्हांला मान्य होतील असे मुद्दे शोधायला हवे. खरतर हे खूप अवघड काम आहे.कारण सहमती असणारे मुद्दे हे खऱ्या अर्थाने मान्य असायला हवे, त्यात वरवरची/खोटी मान्यता नको. एखाद्याचे मत मान्य असणे फार अवघड आहे कारण काही लोकांचा सर्वगोष्टी मान्य करण्याचा कल असतो किंवा सर्वच गोष्टी अमान्य असतात. कारण ती व्यक्ती ठरवून आलेली असते आपण कसं वागायचं.पण समोरच्या व्यक्तीला जाणून घ्यायचं असेल तर असे अहंकाराने बांधून घेवून उपयोग होणार नाही.मग आपण सुंदर मनापासून खूप दूर जातो.
   संजयची  सुद्धा हीच अडचण होती. तो अनेक मुलींना भेटला पण न बोलताच घरी निघून आला. म्हणून आम्ही नीलिमाताईना म्हटलं की आम्ही संजयशी बोललो तर चालेल का? तर त्यांनी आम्हांला त्याच्या लहानपणापासूनच्या शिबिरांची माहिती दिली. त्यांनी त्यांच्या परीने योग्य तेच केले पण त्याला अजूनही काही प्रश्न पडू शकतात आणि त्याची उत्तरे त्याचाशी योग्य संवाद साधल्यावर मिळू शकतात. हेच त्यांना मान्य नव्हतं. कारण त्यांना वाटायचे की संजय साठी एकही सुंदर मुलगी येत नाही.म्हणूनच तो न बोलता परत येतो.त्यांना आम्ही चर्चेसाठी बोलावलं तर त्या म्हणाल्या माझा संजय खूप युक्तिवाद करू शकतो,तुम्हांला यू तो हरविल.आम्ही म्हटलं चालेल,पण त्याला येवू तर द्या. आम्ही नीलिमाताई बरोबर ही चर्चेला तयार झालो कारण आम्हाला माहित आहे की,नेहमी आपलेच बरोबर असणे ही महत्वाची गोष्ट नाही आणि ती निश्चितपणे सुंदर नाही.आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्यासाठी संजयला संवाद साधायला काय अडचण आहे याचा शोध घेणे गरजेचे होते.म्हणून आम्ही मनाशी म्हटलं की ,”चर्चा ही प्रामाणिकपणे खरी असावी,त्यात अह्म्कारातील भांडणापेक्षा विषयाला महत्व द्यायला हवे.  

Friday 2 March 2012

बा,मना सुंदर हो.






बा,मना सुंदर हो. www.daptaryswiwah.com
  सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही.सगळ्यामध्ये काही ना काही सुंदर असतेच. फक्त ते आपल्याला जाणवायला पाहिजे आणि अलीकडच्या आपल्या भाषेत बोलायचं झालं तर ते आपल्याला carry करता यायला पाहिजे.तुमच्या मनात येत असेल की आहो आपलं सौंदर्य दुसऱ्याला जाणवलं तर काही उपयोग नाही तर काय त्याला चाटायचं आहे.काय हे? आपण आपल्याबद्दल एकही चांगला विचार करू शकत नाही. सतत आपण दुसऱ्याच्या डोळ्यांनीच स्वतःकडे बघायचं? माझ्या मते जेव्हा आपण स्वतःला सुंदर दिसू तेव्हाच इतरांचे सौदर्य आपल्याला दिसेल ना?
   मी सौंदर्यावर एवढी घसरली आहे कारण लग्नाच्या बाजारात सुंदरतेच्या खूप गप्पा होतात,त्यावर जोडीदार निवडण्याचे निर्णय घेतले जातात.एखाद्या व्यक्तीला तिच्या बाह्य रूपावरून नाकारले जाते. तेव्हा त्या घरातील सर्वजण खूप दुःखी होतात.मला दिनेश भेटला तेव्हा त्याने खूप फुशारकीने सांगतिले की मी २५ मुली केवळ त्या सुंदर नाहीत म्हणून नाकारल्या. तो म्हणतो मला सुंदर आणि स्मार्टच मुलगी हवी.म्हणजे कशी? हे त्याला कळलेले नाही.तर मितालीने पण २० मुलांना नाकारले कारण ते handsome नव्हते.काय सांगणार या दोघांना? त्यांचे आई-वडील तर पार मेटाकुटीला आले आहेत.पण मी एक गोष्ट सांगितली.
     एका क्लब मध्ये एक पार्टी चालू होती.एका सुंदर स्त्रीने पार्टी मध्ये प्रवेश केला. तिची त्वचा अगदी नितळ होती,कपडे उंची होते,तसेच तिची फिगरही छान होती. आश्चर्य म्हणजे तिलाही तसेच वाटत होते. लोक तिच्याजवळ यायचे आणि पटकन निघून जायचे.
       त्यानंतर एक बुटका,बऱ्याच मिशा असणारा पुरुष पार्टीला आला. त्याच्याभोवती अनेक लोकांचा घोळका जमतो,आणि सहजपणे संभाषण सुरु होते.
   काय चाललयं? वगैरे.संपूर्ण पार्टीतील लोक त्याच्या भोवती गोळा होतात आणि तिथूनच हास्याचे फवारे फुटत असतात.लोक त्याच्या सहवासात खूप आनंदी होतात.
        तुम्ही केवळ शरीराने सुंदर असून चालत नाही तर मनाने ही सुंदर असायला लागते. आपण सर्वजण आपले शरीर सुंदर करण्यासाठी अनेक गोष्टी करतो.जिम मध्ये जावून व्यायाम करतो,शरीराचा काही भाग रंगवतो,शिवतो.चेहरा वेगवेगळी कोस्मेटिक वापरून आकर्षक करतो.तसेच प्लास्टिक सर्जरीने सुंदर बनवतो. पुरुष सुद्धा केसांचे रोपण करू शकतात. सुंदर दिसण्यासाठी वाटेल त्या गोष्टी आपल्याला करता येतात.
   पण तुमच्या मनाच्या सौदर्याच काय? ते सुंदर व्हावे म्हणून काही प्रयत्न आपण करतो का?कंटाळलेल्या मनाबरोबर महान सौंदर्य हे ही कंटाळवाणे च वाटते. तुम्ही कोणाचे लक्ष वेधून घेवू शकाल पण ते टिकवून ठेवू शकणार नाही.
    आपण जन्मतःच विशिष्ट आकाराचा चेहरा आणि शरीर घेवून येतो. आपण काही मर्यादे पर्यंत आपले शरीर सुंदर करू शकतो . पण आपले मन सुंदर करण्यासाठी मात्र आपल्याला खूप काही करता येते.जर आपण नैसर्गिकरित्या सुंदर असू पण आपले  मन कंटाळवाणे असेल तर ती एक शोकांतिका आहे. आपण आपले सौंदर्य वाया घालवित आहोत.हे म्हणजे कसं होईल माहित आहे का? एक सुंदर महागाची कार खरेदी करायची आणि त्याच्यात पेट्रोलच घालायचे नाही असं होईल.

      आपण म्हातारे झाल्यावर आपले शारीरिक सौंदर्य लोप होत जाते. पण मनाच्या सौंदर्याला वयाचे बंधन नसते,ते स्वतंत्र असते आणि उलट शहाणपणा आणि अनुभवामुळेच ते अधिकच खुलते.खूप जण शारीरिक सौदर्यासाठी भरपूर वेळ,पैसा,श्रम खर्च करतात. पण स्वतःचे मन सुंदर करण्यासाठी फार थोडे श्रम आणि वेळ खर्ची पडतो.
    मनाचे सौंदर्य हे आपण  करत असलेल्या संवादातून दिसते. आपण आपले मन सुंदर करू शकतो.म्हणजेच जोडीदार निवडतांना तो मनाने सुंदर आहे की नाही हे बघा कारण तेच सौंदर्य यशस्वी संसारास मदत करणार आहे.