Monday 21 May 2012

शिक्षण व परिपक्वता



www.daptaryswiwah.com आमच्या कडे लग्न करू इच्छिणारे तरूण मुलां-मुलींचे फोन येत असतात.काहीवेळेस ते प्रत्यक्ष भेटायला येत असतात.ते भेटायला येतात तेव्हा त्यांच्याशी मोकळेपणी बोलणं होतं.ते ही त्यांच्या अडीअडचणी सांगतात आणि उपायांसाठी चर्चा करतात.एखादा निर्णय घेतांना या चर्चा खूप उपयोगी पडतात असं आमच्या लक्षात आलं आहे. कालही एक छान व्यक्ती आली.ती उच्च शिक्षित होती.आणि तसाच उच्च शिक्षित जोडीदार तिला हवा होता.आम्हांला यात काहीच वावगं वाटलं नाही.आपल्या बरोबरीने शिकलेला जोडीदार असणं ही अपेक्षा फारशी चुकीची नाही.आणि त्यात काही तर्कशुद्ध कारण असेल तर काहीच हरकत नाही.पण जेव्हा ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीचे पालक जेव्हा एका विशिष्ट शाखेचाच आग्रह धरू लागले तेव्हा मात्र आम्हांला आश्चर्य वाटलं.जेव्हा तिने त्या शाखेचा संदर्भ परिपक्वतेशी लावला तेव्हा मात्र आमच्या आश्चर्यला पारावर राहिला नाही.म्हणजे एखाद्या विशिष्ट शाखेत तुम्ही उच्च शिक्षण घेतलं असेल तर तुम्ही परिपक्व आणि दुसऱ्या शाखेतील उच्च शिक्षण घेतलेली व्यक्ती अपरिपक्व असं कसं काय? समज वाढावी म्हणून दोन्ही शाखांमध्ये असं कोणतच शिक्षण दिलं जात नाही.हे त्या व्यक्तीला माहित नसेल का?आपण कोणत्या शाखेचा अभ्यास करायचा हे आपल्या आवडीनुसार,पालकांच्या इच्छेनुसार,बाहेर कशाला अधिक पैसा मिळणार आहे हे बघून ठरवतो.कोणता अभ्यासक्रम केला म्हणजे आपण समजदार होवू,परिपक्व होवू याचा विचार कोणी करत नाही.
    कामाचे तास,त्यासाठी करावी लागणारी तडजोड विशेषतः मुलींना ,मिळणारा पैसा,प्रतिष्ठा यांचा विचार करून खूप जण विशिष्ट व्यवसायातील ,शाखेतील व्यक्ती जोडीदार म्हणून निवडतात.ते सांगतांना काही सांगोत.पण मूळ हे पैशात असते.मग



असे एका शाखेची मुलं-मुली ती बहुतेक वेळा सोफ्टवेअर मधील असतात.ती त्यांच्या कामाच्या शेड्यूल मध्ये एकमेकांना वेळ देवू शकत नाही. काही ठिकाणी तर एका वेळी एकच जण घरी थांबू शकतो अशी त्यांची कामाची वेळ असते.ते एकमेकांशी बोलू शकत नाही,काही ठरवू शकत नाही. तरीही त्यांना सहजीवनचा जोडीदार असाच हवा असतो.काही ठिकाणी तर कला शाखेत छान उच्च शिक्षण घेतलेल्या मुलीनाही  जोडीदार मात्र सोफ्टवेअर मधील अपेक्षित असतो.असं का होतं? समान आवडी-निवडी असणारा जोडीदाराची अपेक्षा त्या का करत नाही.समजा यांना काही साहित्यिक कार्यक्रम ऐकण्याची,नाटक पाहण्याची आवड असेल आणि  त्यांच्या जोडीदाराला ती आवड नसेल तर ही मुलगी किंवा मुलगा काय करणार? आपल्या आवडी-निवडी सोडून देणार? एक विशिष्ट प्रतिष्टा जपण्यासाठी पोकळ आयुष्य जगणार.कोणत्याही अभिजाततेचा कधीच शोध घेणार नाही.उच्च शिक्षण घेवून आपापल्या क्षेत्रात चमकणारी माणसं अनेकदा बुरसटलेल्या विचारांची,अंधश्रध्द,डोळ्याला झापडं लावून साचेबंद जीवन जगतांना दिसतात. म्हणजे लग्न ठरवतांना आपण नक्की काय पाहत आहोत?फक्त पैसा? जबाबदारी आणि कर्तव्य यांशिवाय येणारा  पैसा?

  आज बहुतांशी मुला-मुलीना मुंबई-पुणे आणि सोफ्टवेअर कंपनी यांचीच साथ हवी आहे.ते दुसरीकडे बघायलाच तयार नाही.या सगळ्याचा अर्थ  कोणाही सामान्य व्यक्तीला कळणार नाही असं थोडच आहे.कारण लग्नाच्या बाजारात मात्र ते ‘शिक्षण बघितलं जातं ते केवळ पदव्यांच्या मोजमापातच!इंजिनियर,डॉक्टर,सी.ए.असेल तर सर्वांनाच ते स्थळ आवडतं,हवं असतं.अमेरिकेतील मुलगा तर त्याच्या साठी भरपूर विचारणा होते.जर या कोणत्याही स्थळाशी नाही जमलं आणि वय ही वाढत गेलं तर मग एक-एक पायऱ्या खाली उतरतात.त्यावेळी ते कमीत कमी पदवीधर,नाहीतर किमान डिप्लोमा झालेला मुलगा असावा असं मुलींना व त्यांच्या पालकांना वाटतं. या ठिकाणी सुसंस्कृत कुटुंब,परिपक्वता,विचारसरणी यांचा विचार फार नंतर येतो.प्रथम विचार येतो तो पैशाचा? नंतर शहराचा,नंतर आमची मुलगी तिथे काही करू शकेल किंवा येणारी मुलगी त्या शहरातली असली आणि नोकरीत असली तर अधिक उत्तम.कारण काळ बदलला आहे ,दोघांनी काम केलं तरच योग्य अशा राहणीमानात राहू शकू.जोडीदाराच्या शिक्षणाचा विचार करतांना त्याबरोबर जे भावी जीवन वाट्याला येणार आहे त्याचाही विचार तितकाच महत्वाचा आहे.कारण उच्च शिक्षणाच पद,पैसा,प्रतिष्ठा याबरोबर सम प्रमाणात असलं तरी वेळेशी मात्र असं व्यस्त असतं. शिवाय अशी व्यक्ती ‘माणूस’ म्हणून कशी आहे, हे वेगळंच! जोडीदार निवडतांना याचं भान हवं.
  लग्नाचा विचार हा एक सोबती,सहजीवनासाठीचा एक जोडीदार,साथी,काही समान आवडी असणारी आयुष्यभराची सोबत यासाठी किती प्रमाणात होतो हे मात्र जोडीदार निवडण्याच्या आजच्या criteria  वरून काहीसे गुपितच राहते.मग आयुष्यभर एक जिगसॉ पझल खेळले जाते.शिक्षणाने स्वतःला एक वेगळे व्यक्तिमत्व मिळते.स्वतःला ओळखण्यासाठी काही कौशल्ये विकसित होतात.तरीही आपण त्याचा उपयोग स्वतःला ओळखण्यासाठी न करता केवळ त्यातून आर्थिक उत्पन्न कसं वाढेल याचा विचार करतो.

No comments:

Post a Comment